Showing posts with label ग्रेस. Show all posts
Showing posts with label ग्रेस. Show all posts

Tuesday, January 18, 2011

संदिग्ध ढगांच्या ओळी - ग्रेस

पाऊस कधीचा पडतो,

झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली,
दुःखाच्या मंद सुराने

डोळयात उतरले पाणी,
पाण्यावर डोळे फिरती
दुःखाचा उतरला पारा,
या नितळ उतरणी वरती

पेटून कशी उजळेना,
ही शुभ्र फुलांची ज्वाला
तार्‍यांच्या प्रहरापाशी
पाऊस असा कोसळला

संदिग्ध ढगांच्या ओळी
आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्‍यावरती
लाटांचा आज पहारा

-- माणिक सी. गोडघाटे उर्फ कवी ग्रेस

भय इथले संपत नाही.....ग्रेस

भय इथले संपत नाही... मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो... तू मला शिकविली गीते...

हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

त्या वेळी नाजूक भोळ्या, वार्याला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती

तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला

देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब

संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

- कवी ग्रेस