Sunday, June 30, 2024

विठ्ठल भजन..........विठू माझा लेकुरवाळा

                                                                 
विठू माझा लेकुरवाळा
सांगे गोपाळांचा मेळा

निवृत्ती हा खांद्यावरी
सोपानाचा हात धरी

पुढे चाले ज्ञानेश्वर
मागे मुक्ताबाई सुंदर

गोरा कुंभार मांडीवरी
चोख जीव बरोबरी

बंका कडेवरी
नामा करांगुली धरी

जणी म्हणे गोपाळा
करी भक्तांचा सोहळा

- पी. सावळाराम

बालगीते............शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा,

शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा,

पोपट होता सभापती मधोमध उभा


पोपट म्हणाला, पोपट म्हणाला, "मित्रांनो

देवाघरची लूट, देवाघरची लूट !

तुम्हा अम्हां सर्वांना एक एक शेपूट

या शेपटाचे कराल काय?"


गाय म्हणाली, "अश्शा अश्शा, शेपटीने मी वारीन माशा."


घोडा म्हणाला, "ध्यानात धरीन, ध्यानात धरीन

मीही माझ्या शेपटीने, असेच करीन, असेच करीन,"


कुत्रा म्हणाला, "खुशीत येईन तेव्हा, शेपूट हलवीत राहीन."


मांजरी म्हणाली, "नाही ग बाई, कुत्र्यासारखे माझे मुळीच नाही,

खूप खूप रागवीन तेव्हा शेपूट फुगवीन, शेपूट फुगवीन."


खार म्हणाली, "पडेल थंडी तेव्हा माझ्या शेपटीची मलाच बंडी."


माकड म्हणाले, "कधी वर कधी बुडी, शेपटीवर मी मारीन उडी."


मासा म्हणाला, "शेपूट म्हणजे दोन हात, दोन हात.

पोहत राहिन प्रवाहात, पोहत राहिन प्रवाहात."


कांगारू म्हणाले, "माझे काय?"

"तुझे काय? हा हा हा !

शेपूट म्हणजे पाचवा पाय."


मोर म्हणाला, "पीस पीस फुलवुन धरीन, मी धरीन

पावसाळ्यात नाच मी करीन."


पोपट म्हणाला, "छान छान !

देवाच्या देणगीचा ठेवा मान.

आपल्या शेपटाचा उपयोग करा."


"नाही तर काय होईल?"


"दोन पायाच्या माणसागत, आपुले शेपूट झडून जाईल."

Wednesday, June 26, 2024

छोटेसे बहीणभाऊ ....... वसंत बापट

 छोटेसे बहीणभाऊ, 

उद्याला मोठाले होऊ 

उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला 

नवीन आकार देऊ 

         ओसाड उजाड जागा, 

         होतील सुंदर बागा शेतांना,

         मळ्यांना, फुलांना, फळांना 

         नवीन बहार देऊ 

मोकळ्या आभाळी जाऊ, 

मोकळ्या गळ्याने गाऊ 

निर्मळ मनाने, आनंदभराने 

आनंद देऊ अन् घेऊ 

            प्रेमाने एकत्र राहू, 

            नवीन जीवन पाहू, 

            अनेक देशांचे, भाषांचे, वेशांचे 

            अनेक एकत्र होऊ


--वसंत बापट

Tuesday, June 25, 2024

हीच अमुची प्रार्थना .... समीर सामंत (उबंटू )

                                    हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे

माणसाने माणसाशी माणसासम वागणे ||

भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी,
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री,

तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे ||

धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे
एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे

अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे ||

लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले
पाउले चालो पुढे.. जे थांबले ते संपले

घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे ||

Thursday, September 16, 2021

उभा कसा राहीला विटेवरी.. (विठ्ठल भजन)

 

विठ्ठल विठ्ठल म्हणतील सगळे....

विठूराय कितीसे दूर....

इमानदारांच्या समीप अन्.....
बैमानापासून दूर....

पंढरीचा विठ्ठल कूणी पाहीला.....(2)
उभा कसा राहीला विटेवरी.....(3).....||धृ.||

अंगी शोभे पितांबर पिवळा....
गळ्यामध्ये वैजयंती माळा.....
चंदनाचा टिळा माथी शोभला....(2)
उभा कसा राहीला विटेवरी.....(3)......||1||

चला चला पंढरीला जाऊ....
डोळे भरूनी विठू माऊलीला पाहू....
भक्ती मार्ग आम्हाला त्याने दाविला.....(2)
उभा कसा राहीला विटेवरी.....(3).....||2||

ठेवूनिया दोन्ही करकटी....
उभा हा मुकूंद वाळवंटी.....
हरिनामाचा झेंडा तिथे रोविला.....(2)
उभा कसा राहीला विटेवरी.....(3).....||3||

बाळ श्रावण प्रार्थी आता....
नका दूर लोटू पंढरीनाथा....
तव चरणी हा देह सारा वाहिला....(2)
उभा कसा राहीला विटेवरी.....(3).....||4||

पंढरीचा विठ्ठल कूणी पाहीला.....(2)
उभा कसा राहीला विटेवरी.....(3)

Wednesday, November 7, 2018

गुंतता हृदय हे ...

गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी
हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी

या इथे जाहला संगम दो सरितांचा
प्राक्तनी आपुल्या योग तिथे प्रीतीचा
अद्वैत आपुले घडता या तीर्थाशी
हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी

दुर्दैवे आपण दुरावलो या देही
सहवास संपता डागळले ऋण तेही
स्मर एकच तेव्हा सखये निज हृदयाशी
हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी

गीतकार : वसंत कानेटकर,
मूळ गायक : रामदास कामत,
संगीतकार : पं. जितेंद्र अभिषेकी,
गीतसंग्रह/चित्रपट : संगीत मत्स्यगंधा

Tuesday, June 20, 2017

अविनाश धर्माधिकारी - चाणक्य मंडल प्रार्थना

नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी,
मनी हास्य लेवुन मुक्ति जगवी,
हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती,
नवी धेय्य आसक्त प्रल्हाद भक्ती |

अहंता गळावी अभंगास म्हणता,
तपस्येत तल्लिन आतुन होता,
प्रतिभेस मस्तीत आकार यावे,
उरी उत्तमाचेच ओमकार गावे,

हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती,
नवी धेय्य आसक्त प्रल्हाद भक्ती |

जरी एक अश्रु पुसायास आला,
तरी जन्म काहिच कामास आला,
जरी अश्रु विस्फोट होवुन सजला,
तरी मुक्त ज्वलामुखी जन्म झाला,

हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती,
नवी धेय्य आसक्त प्रल्हाद भक्ती |