Showing posts with label साने गुरुजी. Show all posts
Showing posts with label साने गुरुजी. Show all posts

Tuesday, January 25, 2011

बलसागर भारत होवो

बलसागर भारत होवो।
विश्वात शोभुनी राहो ।।धृ।।

हे कंकण करि बान्धियले
जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे ठरले
मी सिध्द मरायाला हो।
बलसागर भारत होवो ।।1।।

वैभवी देश चढवीन
सर्वस्वी त्यास अर्पिन
तिमिर घोर संहारीन
या बन्धु सहाय्याला हो।
बल सागर भारत होवो ।।2।।

हातात हात घालून
हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून
या कार्य करायाला हो।
बलसागर भारत होवो ।।3।।

करि दिव्य पताका घेऊ
प्रिय भारत गीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू
ही माय निजपदा लाहो।
बलसागर भारत होवो ।।4।।

या उठा करू हो सार्थ
सम्पादु दिव्य पुरूषार्थ
जीवन हे ना तरि व्यर्थ
भाग्यसूर्य तळपत राहो।
बलसागर भारत होवो ।।5।।

मी माय थोर होईल
वैभव दिव्य शोभेल
जगतास शान्ति देईल
तो सोन्याचा दिस येवो।
बलसागर भारत होवो ।।6।।
- साने गुरूजी

आता उठवू सारे रान.........साने गुरुजी

आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण

किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेउनी पेटवतिल सारे रान

कोण आम्हा अडवील, कोण आम्हा रडवील
अडवणूक त्या करणारांची उडवू दाणादाण

शेतकऱ्यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडि पडे
तिरंगि झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान

पडून ना राहू आता, खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन्‌ कामकरी मांडणार हो ठाण

Wednesday, December 30, 2009

खरा तो एकचि धर्म.............साने गुरुजी

खरा तो एकचि धर्म...

खरा तो एकचि धर्म । जगाला प्रेम अर्पावे॥

जगी जे हीन अति पतित
जगी जे दीन पद-दलित
तया जाऊन उठवावे । जगाला प्रेम अर्पावे॥

सदा जे आर्त अति विकल
जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे । जगाला प्रेम अर्पावे॥

कुणा ना व्यर्थ शिणवावे
कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्ता बंधु मानावे । जगाला प्रेम अर्पावे॥

प्रभूची लेकरे सारी
तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे । जगाला प्रेम अर्पावे॥

असे हे सार धर्माचे
असे हे सार सत्याचे
परार्था प्राणही द्यावे । जगाला प्रेम अर्पावे॥


कवी - साने गुरुजी