Showing posts with label माधव ज्यूलीअन. Show all posts
Showing posts with label माधव ज्यूलीअन. Show all posts

Tuesday, January 18, 2011

कशासाठी पोटासाठी

कशासाठी पोटासाठी

खंडाळ्याच्या घाटासाठी

चला खेळू आगगाडी,
झोका उंच कोण काढी?
बाळू, नीट कडी धर
झोका चाले खाली वर
ऐका कुकुक्‌ शिट्टी झाली
बोगद्यात गाडी आली
खडखड भकभक
अंधारात लखलख
इंजिनाची पहा खोडी
बोगद्यात ध्रुर सोडी
नका भिऊ थोड्यासाठी
लागे कुत्रे भित्यापाठी

उजेड तो दूर कसा
इवलासा कवडसा
नागफणी डावीकडे
कोकण ते तळी पडे
पाठमोरी आता गाडी
वाट मुंबईची काढी
खोल दरी उल्लासाची
दोन डोक्यांचा राजमाची
पडे खळाळत पाणी
फेसाळल्या दुधावाणी
आता जरा वाटे दाटी
थंड वारा वरघाटी

डावलून माथेरान
धावे गाडी सुटे भान
तारखांब हे वेगात
मागे मागे धावतात
तार खाली वर डोले
तिच्यावर दोन होले
झाडी फिरे मंडलात
रूळ संगे धावतात
आली मुंबई या जाऊ
राणीचा तो बाग पाहू
गर्दी झगमग हाटी-
कशासाठी? पोटासाठी !

- माधव ज्यूलीअन

प्रेमास्वरूप आई

प्रेमास्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई !

बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?

तू माय, लेकरू मी; तू गाय, वासरू मी;
ताटातुटी जहाली, आता कसे करू मी ?

गेली दुरी यशोदा, टाकूनि येथ कान्हा,
अन्‌ राहिला कधीचा तान्हा तिचा भुका ना?

तान्ह्यास दूर ठेवी - पान्हा तरीहि वाहे -
जाया सती शिरे जी आगीत, शांत राहे;

नैष्ठुर्य त्या सतीचे, तू दाविलेस माते,
अक्षय्य हृत्प्रभूचे सामीष्य साधण्याते.

नाही जगात झाली आबाळ या जिवाची,
तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची.

चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा,
आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका.

विद्या धनप्रतिष्ठा, लाभे अता मला ही,
आईविणे परी मी, हा पोरकाच राही.

सारे मिळे परंतू, आई पुन्हा न भेटे,
तेणे चिताच चित्ती, माझ्या अखंड पेटे.

आई तुझ्या वियोगे, ब्रम्हांड आठवे गे !
कैलास सोडुनी ये उल्केसमान वेगे.

किंवा विदेह आत्मा, तूझा फिरे सभोंती,
अव्यक्त अश्रुधारा, की तिर्थरुप ओती !

ही भूक पोरक्याची, होई न शांत आई
पाहूनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनांही

वाटे इथूनि जावे, तूझ्यापुढे निजावे
नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे !

वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके,
देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके ?

घे जन्म तू फिरूनी, येईन मीही पोटी,
खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी !


- माधव ज्यूलीअन