Showing posts with label बडबडगीते -बालगीते. Show all posts
Showing posts with label बडबडगीते -बालगीते. Show all posts

Sunday, June 30, 2024

बालगीते............शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा,

शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा,

पोपट होता सभापती मधोमध उभा


पोपट म्हणाला, पोपट म्हणाला, "मित्रांनो

देवाघरची लूट, देवाघरची लूट !

तुम्हा अम्हां सर्वांना एक एक शेपूट

या शेपटाचे कराल काय?"


गाय म्हणाली, "अश्शा अश्शा, शेपटीने मी वारीन माशा."


घोडा म्हणाला, "ध्यानात धरीन, ध्यानात धरीन

मीही माझ्या शेपटीने, असेच करीन, असेच करीन,"


कुत्रा म्हणाला, "खुशीत येईन तेव्हा, शेपूट हलवीत राहीन."


मांजरी म्हणाली, "नाही ग बाई, कुत्र्यासारखे माझे मुळीच नाही,

खूप खूप रागवीन तेव्हा शेपूट फुगवीन, शेपूट फुगवीन."


खार म्हणाली, "पडेल थंडी तेव्हा माझ्या शेपटीची मलाच बंडी."


माकड म्हणाले, "कधी वर कधी बुडी, शेपटीवर मी मारीन उडी."


मासा म्हणाला, "शेपूट म्हणजे दोन हात, दोन हात.

पोहत राहिन प्रवाहात, पोहत राहिन प्रवाहात."


कांगारू म्हणाले, "माझे काय?"

"तुझे काय? हा हा हा !

शेपूट म्हणजे पाचवा पाय."


मोर म्हणाला, "पीस पीस फुलवुन धरीन, मी धरीन

पावसाळ्यात नाच मी करीन."


पोपट म्हणाला, "छान छान !

देवाच्या देणगीचा ठेवा मान.

आपल्या शेपटाचा उपयोग करा."


"नाही तर काय होईल?"


"दोन पायाच्या माणसागत, आपुले शेपूट झडून जाईल."

Tuesday, January 18, 2011

मामाची गाडी

माझ्या मामाची रंगीत गाडी हो

तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो

कशी दौडत दौडत येई हो
मला आजोळी घेऊन जाई हो
नाही बिकट घाट,
सारी सपाट वाट,
मऊ गालीचे ठायी ठायी हो

शीळ घालून मंजूळ वाणी हो
पाजी बैलांना ओहोळ पाणी हो
गळा खुळखुळ घुंगुर माळा हो
गाई किलबील विहंग मेळा हो
बाजरीच्या शेतात,
करी सळसळ वात,
कशी घुमली अंबेराई हो

कोण कानोसा घेऊन पाही हो
कोण लगबग धावून येई हो
गहिवरून धरून पोटी हो
माझे आजोबा चुंबन घेती हो
लेक एकुलती,
नातू एकुलता,
किती कौतुक कौतुक होई हो

- ग. ह. पाटील

डरांव डरांव बालगीत)

आभाळ वाजलं धडामधूम

वारा सुटला सूं सूं सूं
वीज चमकली चक चक चक
जिकडे तिकडे लख लख लख
पाऊस आला धो धो धो
पाणी वाहिले सो सो सो
पाण्यात बोट सोडली, सोडली
हातभर जाऊन बुडली, बुडली.
बोटीवर बसले बेडूकराव
बेडूक म्हणाला डरांव डरांव.

इंजिनदादा (बालगीत)

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
डबे मी जोडतो, तुम्हांला नेतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
पाणी मी पितो, वाफ मी सोडतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
कोळसा मी खातो, धुर मी सोडतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
हिरवे निशाण बघतो, चालायला लागतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
शिट्टी मी फुंकतो, गर्दी हटवतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
लाल निशाण बघतो, उभा मी राहतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
झुकझुक मी करतो, तुम्हाला घेतो,
गावाला जातो नव्या नव्या

- (अज्ञात)

Tuesday, January 11, 2011

स्वप्नात पाहिली राणीची बाग.....विंदा करंदीकर

स्वप्नात पाहिली राणीची बाग
हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग
हरणाबरोबर खेळत पत्ते
बसले होते दोन चित्ते
उंट होता वाचत कुराण
माकड होते सांगित पुराण
सिंह होता व्याख्यान देत
गाढव होते उतरुन घेत
जिराफ होता गात छान
मानेइतकीच लांब तान
कोल्हा होता दुकानदार
त्याच्या दुधात पाणी फार
मला पहाता म्हणती सारे
एक पिंजरा याला द्यारे
त्याबरोबर आली जाग
स्वप्नात पाहिली राणीची बाग

Wednesday, May 13, 2009

बालगीते......या बाई या

या बाई या
बकुळीच्या झाडाखाली फुले वेचू या

ऊन पडले
पान फूल दिसे कसे गडगोडुले

गोडगोडुले
मोतियाचे दाणे कुणी खाली पाडले

रान हालले
पहाटेला शुकदेव गाणे बोलले

बालगीते.....ये गं ये गं गाई गोठ्यात 2

ये गं ये गं गाई गोठ्यात
बाळाला दुदु दे वाटीत
बाळाची वाटी मनीमाऊ चाटी
मनीमाऊ गेली रागाने
तिला गं खाल्ले वाघाने
वाघ मोठ दमणीचा
डोळा फुटला बबनीचा
बबन बिचारी तडफडली
हंडीमडकी गडगडली
हंड्यात बबनचे मेहुणे
ते दरसालचे पाहुणे
पाहुणे गेले गं ताकाला
विंचू डसला नाकाला

बालगीते.....लहान माझी बाहुली

लहान माझी बाहुली
मोठी तिची सावली

घारे डोळे फिरवीते
लुकूलुकू ही पहाते

नकटे नाक उडवी
तेगुबरे गाल फुगवीते

दात काही घासत नाही
अंग काही धूत नाही

भात केला करपुन गेला
पोळ्या केल्या कच्च्या झाल्या

वरण केले पातळ झाले
तूप सगळे सांडून गेले

असे भुकेले नक्का जाऊ
थाम्बा करते गोड खाऊ

केळीचे शिकरण करायला गेली
दोनच पडले दात

आडाचे पाणी काढायला गेली
धपकन पडली आत

बालगीते......ये गंS गाई गोठ्यात 1

ये गंS गाई गोठ्यात
बाळाला दुदु दे वाटीत
बाळाची वाटी मांजर चाटी
मांजर गेले रागाने
तिला खाल्ले वाघाने
वाघमामा डुलSSSतो
अस्वलमामा पोळ्या करतो
एक पोळी करSSपली
दुधासंगे वरSSपली
दूध लागले कSSSडू
बाळाला आले रSSSडू
बाळ गेले झोSSSपी
बाळाला आली टोSSSपी

बालगीते......उठा उठा चिऊताई

उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे कसे मिटलेले
अजूनही अजूनही !

सोनेरी हे दूत आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यांवर झोप कशी
अजूनही अजूनही !

लगबग पाखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहीकडे चोहीकडे !

झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या चिमुकल्या !

बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
उठोनिआ दूर जाई
भूर भूर भूर भूर !
-कुसुमाग्रज

बालगीते......चिउ चिउ ये.......अटक मटक चवळी चटक

चिउ चिउ ये
दाणा खा
पाणि पी
भुर्र्रर्रर्र उडून जा

---------------------------------------------------------------------

इथं इथं बैस रे मोरा
तान्हं बाळ घालतंय चारा...
चारा खा, पाणी पी
भुरर्कन उडून जा...

---------------------------------------------------------------------

अटक मटक चवळी चटक
चवळी झाली गोड गोड
जिभेला आला फोड फोड
फोड काही फुटेना
घरचा पाहूणा उठेना

---------------------------------------------------------------------

सर सर उंच वाढलं झाड वाढलं झाड
बघता बघता गेलं ढगा आड ढगा आड
ढगांच झालं पाणीच पाणी पाणीच पाणी
झाडाला सुचली गोड गाणी गोड गाणी
गाण्यांची झाली फळं फुलं फळं फुलं
वेचायली आली मुली मुलं मुली मुल




बालगीते..... ये रे ये रे पावसा

ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा

ये गं ये गं सरी,
माझे मडके भरी
सर आली धावून,
मडके गेले वाहून

बालगीते.....नाच रे मोरा, आंब्याच्या वनात

नाच रे मोरा, आंब्याच्या वनात

नाच रे मोरा नाच

ढगांशी वारा झुंजला रे

काळा काळा कापूस पिंजला रे

आता तुझी पाळी, वीज देते टाळी

फुलव पिसारा नाच, नाच रे मोरा ...

झरझर धार झरली रे

झाडांची भिजली इरली रे

पावसात न्हाऊ, काहीतरी गाऊ

करुन पुकारा नाच, नाच रे मोरा ...

थेंब थेंब तळयात नाचती रे

टपटप पानांत वाजती रे

पावसाच्या रेघात, खेळ खेळू दोघांत

निळया सवंगडया नाच, नाच रे मोरा ...

पावसाची रिमझिम थांबली रे

तुझी माझी जोडी जमली रे

आभाळात छान छान सात रंगी कमान

कमानीखाली त्या नाच, नाच रे मोरा ...

बालगीते.....तुझ्या गळा, माझ्या गळा

"तुझ्या गळा, माझ्या गळा
गुंफू मोत्यांच्या माळा "
"ताई, आणखि कोणाला ?"
"चल रे दादा चहाटळा !"

"तुज कंठी, मज अंगठी !"
"आणखि गोफ कोणाला ?"
"वेड लागले दादाला !"
"मला कुणाचे ? ताईला !"

"तुज पगडी, मज चिरडी !"
"आणखि शेला कोणाला ?"
"दादा, सांगू बाबांला ?"
"सांग तिकडच्या स्वारीला !"

"खुसू खुसू, गालि हसू"
"वरवर अपुले रुसू रुसू "
"चल निघ, येथे नको बसू"
"घर तर माझे तसू तसू."

"कशी कशी, आज अशी"
"गंमत ताईची खाशी !"
"अता कट्टी फू दादाशी"
"तर मग गट्टी कोणाशी ?"

बालगीते.....टप टप टप टप टाकित टापा

टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा
पाठीवरती जीन मखमली पायि रुपेरी तोडा !

उंच उभारी दोन्ही कान
ऐटित वळवी मान-कमान
मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा !

घोडा माझा फार हुशार
पाठीवर मी होता स्वार
नुसता त्याला पुरे इषारा, कशास चाबुक ओढा !

सात अरण्ये, समुद्र सात
ओलांडिल हा एक दमात
आला आला माझा घोडा, सोडा रस्ता सोडा !

बालगीते.....टप टप टप थेंब वाजती

टप टप टप थेंब वाजती, गाणे गातो वारा
विसरा आता पाटी-पुस्तक, मजेत झेला धारा
पाऊस आला रे पाऊस आला

घराघरावर, कौलारावर, आले झिमझिम पाणी
गुणगुणती झाडांची पाने हिरवी-हिरवी गाणी
अवती-भवती भिजून माती, सुगंध भरला सारा

काळ्याभोर ढगांना झाली कोसळण्याची घाई
इवले इवले पंख फुलवुनी गाते ही चिऊताई
आनंदे हंबरते गाई समोर विसरून चारा

-मंगेश पाडगावकर

बालगीते......झुक झुक झुक झुक अगीनगाडी

झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेखा हवेत काढी
पळती झाडे पाहूया,
मामाच्या गावाला जाऊया

मामाचा गाव मोठा
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुनी घेऊया

मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया

मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामन खाऊया

मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी लेऊया

बालगीते....अ आ आई

अ आ आई, म म मका
मी तुझा मामा दे मला मुका

प प पतंग आभाळात उडे
ढ ढ ढगांत चांदोमामा दडे
घ घ घड्याळ, थ थ थवा
बाळ जरि खट्याळ, तरि मला हवा

ह ह हम्मा गोड दूध देते
च च चिऊ अंगणात येते
भ भ भटजी, स स ससा
मांडिवर बसा नि खुदकन हसा

क क कमळ पाण्यावर डुले
ब ब बदक तुरुतुरु चाले
ग ग गाडी झुक झुक जाई
बाळ माझे कसे गोड गाणे गाई

बालगीते......इवल्या इवल्याशा, टिकल्या-टिकल्यांचे

इवल्या इवल्याशा, टिकल्या-टिकल्यांचे
देवाचे घर बाइ, उंचावरी
ऐक मजा तर ऐक खरी

निळी निळी वाट, निळे निळे घाट
निळ्या निळ्या पाण्याचे झुळझुळ पाट
निळ्या निळ्या डोंगरात निळी निळी दरी

चांदीच्या झाडांना सोन्याची पाने
सोनेरी मैनेचे सोनेरी गाणे
सोन्याची केळी, सोन्याचा पेरू
सोनेरी आंब्याला सोन्याची कैरी

देवाच्या घरात गुलाबाची लादी
मऊ मऊ ढगांची अंथरली गादी
चांदण्यांची हंडी, चांदण्यांची भांडी
चांदोबाचा दिवा मोठा लावला वरी

बालगीते.....गोरी गोरीपान

गोरी गोरीपान, फुलासारखी छान
दादा, मला एक वहिनी आण

गोऱ्या गोऱ्या वहिनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी
चांदण्यांच्या पदराला बिजलीचा बाण !

वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
हरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान !

वहिनीशी गट्टि होता तुला दोन थापा
तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्या परी होऊ दोघी आम्ही सान !