Showing posts with label भोंडल्याची ( भूलाबाई/हादग्याची) गाणी. Show all posts
Showing posts with label भोंडल्याची ( भूलाबाई/हादग्याची) गाणी. Show all posts

Wednesday, January 5, 2011

कृष्ण घालीतो लोळण यशोद....... भोंडल्याची ( भूलाबाई/हादग्याची) गाणी


कृष्ण घालीतो लोळण यशोदा आली ती धाऊन

काय रे मागतोस बाळा तुला देते मी आणऊन

आई मला चंद्र दे आणून त्याचा चेंडू दे करुन

असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं

आई मला विंचू दे आणून त्याची अंगठी दे करुन

असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं

आई मला साप दे आणून त्याचा चाबूक दे करुन

असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं

हरीच्या नैवेद्याला केली...... भोंडल्याची ( भूलाबाई/हादग्याची) गाणी


हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली

त्यातलं उरलं थोडं पीठं त्याचं केलं थालीपीठं

नेऊनी वाढीलं पानातं जिलबी बिघडली

त्यातला उरला थोडा पाक त्याचा केला साखरभातं

नेऊनी वाढीला पानातं जिलबी बिघडली

त्यातलं उरलं थोडं तूप त्याच्या केल्या पुर्‍या छानं

नेऊनी वाढील्या पानातं जिलबी बिघडली


दीड दमडीचं तेल आणलं ..... भोंडल्याची ( भूलाबाई/हादग्याची) गाणी


दीड दमडीचं तेल आणलं

मामंजींची शेंडी झाली भावोजींची दाढी झाली

सासुबाईंचं न्हाणं झालं वन्सबाईंची वेणी झाली

उरलेलं तेल झाकून ठेवलं

ह्त्तीणीचा पाय लागला वेशीबाहेर ओघळ गेला

सासुबाई सासुबाई अन्याय झाला चार चाबुक अधीक मारा

दहीभात जेवायला घाला माझं उष्ट तुम्हीच काढा


Tuesday, January 4, 2011

आज कोण पाहुणे आले ग ..... भोंडल्याची ( भूलाबाई/हादग्याची) गाणी


आज कोण पाहुणे आले ग बाई ? सासरा पाहूणा आला ग बाई

सासर्‍याने काय आणल ग बाई ? सासर्‍यान आणल्या पाटल्या

पाटल्या मी घेत नाही, संग मी येत नाही, चारी दरवाजे लावा ग बाई

झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥१॥

आज कोण पाहुणे आले ग बाई ? सासु पाहुणॆ आले ग बाई

सासुन काय आनल ग बाई ? सासुने आणले गोट

गोट मी घेत नाही , संग मी येत नाही, चारी दरवाजे लावा ग बाई

झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥२॥

आज कोण पाहुणे आले ग बाई ? दीर पाहुणा आला ग बाई

दीरान काय आणल ग बाई ? दीरान आणल्या बांगड्या

बांगड्या मी घेत नाही, संग मी येत नाही, चारे दरवाजे लावा बाई

झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥३॥

आज कोण पाहूणे आले ग बाई । जाऊ पाहुणी आली ग बाई

जावेन काय आणल ग बाई ? जावेन आणली नथ

नथ मी घेत नाहीं , संग मी येत नाही , चारी दरवाजे लावा बाई

झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥४॥

आज कोण पाहुणे आले ग बाई ? नणंद पाहूणी आली ग बाई

नणंदेन काय आणल ग बाई ? नणंदेन आणल्या साखळ्या

साखळ्या मी घेत नाही, संग मी येत नाही, चारी दरवाजे लावा बाई

झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥५॥

आज कोण पाहुणे आले ग बाई ? पती पाहुणे आले ग बाई

पतीने काय आणल ग बाई ? पतीन आणल मंगळसुत्र

मंगळसुत्र मी घेते , संगे मी येते, चारी दरवाजे उघडा ग बाई

झिप्रं कुत्र बांधा ग बाई ॥६॥


काळी माती मऊ मऊ माती .......भोंडल्याची ( भूलाबाई/हादग्याची) गाणी


काळी माती मऊ मऊ माती परडीत भरावी

अस्सी परडी सुरेख बाई धान्य ते पेरावे

अस्स धान्य सुरेख बाई माळा त्या बांधाव्या

अश्शा माळा सुरेख बाई हस्तालाही घालाव्या

अस्सा हस्त सुरेख बाई पाटावरी काढावा

अस्सा पाट सुरेख बाई फेर भोवती धरावा

अस्सा फेर सुरेख बाई गाणी ती म्हणावी

अश्शी गाणी सुरेख बाई मनाला रमवाव

अस्स मन सोज्वळ बाई पावसासारखं निर्मळ

अस्स पाऊस सुरेख बाई शेताला भिजवित

अस्स शेत सुरेख बाई धान्य आम्हा देत

अस्स धान्य सुरेख बाई खायाला मिळत.


आड बाई आडवाणी आडाचं प..........भोंडल्याची ( भूलाबाई/हादग्याची) गाणी


आड बाई आडवाणी

आडाचं पाणी खारवणी

आडाच पडली सुपारी

आमचा भोंडला दुपारी

आडात पडला शिंपला

आमच्या भोंडला संपला


सोन्याचा कंरडा बाई मोत. ..... भोंडल्याची ( भूलाबाई/हादग्याची) गाणी


सोन्याचा कंरडा बाई मोत्याचं झाकण

तिथं आमच्या सासुबाई कुंकु लावीत होत्या

सासुबाई सासुबाई मला आलं मूळ

मला काय पुसतास बरीच दिसतीस

पुस जा आपल्या सासर्‍याला ॥

सोन्याची दऊत बाई मोत्याची लेखणी

तिथं आमचे मामंजी लिहीत मूळ

मामंजी मामंजी मला आल मुळ

मला काय पुसतीस बरीच दिसतील

पुस जा आपल्या जावेला

सोन्याचा डेरा बाई मोत्याची रवी

तिथं आमच्या जाऊबाई ताक करीत होत्या

जाऊबाई जाऊबाई मला आलं मूळ

मला काय पुसतीस बरिच दिसतीस


पुस जा आपल्या दीराला

सोन्याची विटी आणि मोत्याचा चेंडू

तिथं आमचे भाऊजी खेळत होते


भावोजी भावोजी मला आलं मूळ

मला काय पुसतीस बरीच दिसतीस

पुस जा आपुल्या नणंदेला


सोन्याची सुपली बाई मोत्यांनी गुंफीली

तिथं आमच्या वन्स पाखडत होत्या

वन्सबाई वन्सबाई मला आलं मूळ

मला काय पुसतीस बरीच दिसतीस

पुस ज्या आपुल्या पतीला

सोन्याच पलंग बाई मोत्याचे खूर

तिथं आमचे पतिराज झोपले होते

पतिराज पतिराज मला आलं मूळ

आणा फणी घाला वेणी

जाऊ दे राणी माहेरा

जाती तशी जाऊ दे

निळ्या घोडीवर बसु दे


निळी घोडी हसली

सखुबाई सुंदर दिसली ॥


आज कोण वार बाई । आज .....भोंडल्याची ( भूलाबाई/हादग्याची) गाणी


आज कोण वार बाई । आज कोण वार?

आज आहे सोमवार । शंकराला नमस्कार ।

आज कोण वार बाई । आज कोण वार?

आज आहे मंगळवार । देवीला नमस्कार ।

आज कोण वार बाई । आज कोण वार?

आज आहे बुधवार । बृहस्पतीला नमस्कार ।

आज कोण वार बाई । आज कोण वार?

आज आहे गुरुवार । दत्ताला नमस्कार।

आज कोण वार बाई । आज कोण वार?

आज आहे शुक्रवार । अंबाबाईला नमस्कार ।

आज कोण वार बाई । आज कोण वार?

आज आहे शनिवार । शनिला नमस्कार ।

आज कोण वार बाई । आज कोण वार ?

आज आहे रविवार । सुर्याला नमस्कार ।


कार्ल्याचा वेल लाव ग सुने लाव ग सुने.....भोंडल्याची ( भूलाबाई/हादग्याची) गाणी


कारल्याचा वेल लाव गं सुने लाव गं सुने

मग जा अपुल्या माहेरा माहेरा

कारल्याचा वेल लावला हो सासुबाई लावला हो सासुबाई

आता तरी जाऊ का माहेरा माहेरा

कारल्याला कालि येऊ दे गं सुने येऊ दे गं सुने

मग जा अपुल्या माहेरा माहेरा

कारल्याला कालि आलं हो सासुबाई आलं हो सासुबाई

आता तरी जाऊ का माहेरा माहेरा

कारल्याची भाजी कर गं सुने कर गं सुने

मग जा अपुल्या माहेरा माहेरा

कारल्याची भाजी केली हो सासुबाई केली हो सासुबाई

आता तरी जाऊ का माहेरा माहेरा

कारल्याची भाजी खा गं सुने खा गं सुने

मग जा अपुल्या माहेरा माहेरा

कारल्याइची भाजी खाल्ली हो सासुबाई खाल्ली हो सासुबाई

आता तरी जाऊ का माहेरा माहेरा

आपलं उष्ट काढ गं सुने काढ गं सुने

मग जा अपुल्या माहेरा माहेरा

आपलं उष्ट काढलं हो सासुबाई काढलं हो सासुबाई

आता तरी जाऊ का माहेरा माहेरा

आणा फणी घाला वेणी जाऊ द्या राणी माहेरा माहेरा

आणली फणी घातली वेणी गेल्या राणी माहेरा माहेरा

सासुरवासी सुन रुसुन बसली कैसी.....भोंडल्याची ( भूलाबाई/हादग्याची) गाणी


नणंद भावजया खेळत होत्या, भावजयीवर आळा डाव भावजय बसली रुसुन.

सासुरवासी सुन रुसुन बसली कैसी

यादवराया । राणी घरासी येईल कैसी ॥१॥

सासरा गेला समजावयाला । 'ऊठ ऊठ मुली चल घराला

माझी दौत लेखणी देतो तुला'

'तुमची दौत लेखणी नको मला । मी नाही यायची तुमच्या घराला'॥२॥

सासु गेलीं समजावयाला । 'ऊठ ऊठ मुली चल घराला

माझा डेरा रवी देते तुला'

तुमचा डेरा रवी नको मजला । मी नाही यायची तुमच्या घराला ॥३॥

दीर गेका समजावयाला । 'ऊठा ऊठा वहिनी चला घराला

माझा विटी दांडू देतो तुम्हाला'

तुमचा विटी दांडु नको मला । मी नाही यायची तुमच्या घराला ॥४॥

जाऊ गेली समजावयाला । 'ऊठा ऊठा बाई चला घराला

माझा फणी करंडा देते तुम्हाला'

तुमची फणी करंडा नको मला । मी नाही यायचे तुमच्या घराला ॥५॥

नणंद गेली समजावयाला ।'ऊठा ऊठा वहिनी चला घराला


माझा खेळ देते तुम्हाला'

तुमचा खेळ नको मला । मी नाही यायचे तुमच्या घराला ॥६॥

पति गेले समजावयाला । 'ऊठ ऊठ राणी चल घराला

माझा लाल चाबुक देतो तुला'

तुमचा लाल चाबूक हवा मला । मी येते तुमच्या घराला ॥७॥

सासुरवासी सुन घरासे आली ऎसी

यादवराया । राणी घरासी आली ऎसी

आणा फणकट घाला वेणकट जाऊद्या सुनकट माहेरा

आणली फणी घातली वेणी गेली राणी माहेरा ॥८॥



आला चेंडू , गेला चेंडू ..... भोंडल्याची ( भूलाबाई/हादग्याची) गाणी


आला चेंडू, गेला चेंडू, लाल चेंडू झुगारिला ।

आपण चाले हत्ती घोडे, राम चाले पायीं ।

एवढा डोंगर शोधिला, राम कोठें नाहीं ।

राम ग वेचीतो कळ्या, सीता ग गुंफीती जाळ्या ।

आली ग लगीन वेळा, आकाशीं घातिला मंडप ।

मंडप मंडप बसते पोती । पोती पोती तिरुबाई राळा ।

जरतारी घातलं बोहलं , नवरा नवरी बसली पाटीं ।

पोशीन पायी तिरुबाई राळा, तिरुबाई राळा मुंजा बाळा ।

मुंजाबाळाची मुंजक दोरी, तीच दोरी सावध करी ।

सावध सावध सर्वकाळ , सर्वकाळाचा उत्तम दोर ।

दोर बांधा झाडासी, झाड झबका फुल टपका ।

तें बाई फूल तोडावं, बहिणी माथां खोवावं ।

बहिणी तुझे केस ग, मोतीयाचे घोस ग ।

बहिणी तुझा वेणी ग , केतकीची फणी ग ।

बहिणी तुझा भांग ग, पौर्णिमेचा चांद ग ।

बहिणी तुझा खोपा ग, उंदिर घेतो झोपा ग ।


अक्कणमाती चिक्कणमाती ..... भोंडल्याची ( भूलाबाई/हादग्याची) गाणी


अक्कणमाती चिक्कणमाती,

अशी माती सुरेख बाई, ओटा जो घालावा

असा ओटा सुरेख बाई, जातं ते रोवावं ।

असं जातं सुरेख बाई, सपीट काढावं ।

असं सपीट सुरेख बाई, करंज्या कराव्या ।

अशा करंज्या सुरेख बाई , तबकीं भराव्या ।

असं तबक सुरेख बाई, शेल्यानं झाकावं ।

असा शेला सुरेख बाई, पालखीं ठेंवावा ।

अशी पालखी सुरेख बाई, माहेरीं धाडावी ।

असं माहेर सुरेख बाई, खेळाया मिळतं ।

असं सासर द्वाड बाई, कामाल जुंपतं ॥


तुझ्या ग माहेरच्यांनी.......भोंडल्याची ( भूलाबाई/हादग्याची) गाणी


'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'

'माझ्या ग माहेरच्यांनी दिल्या मला साखळ्या ।'

'असल्या कसल्या साखळ्या बाई फुलाच्या पाकळ्या ।'

'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'

'माझ्या ग माहेरच्यांनी दिल्या मला पाटल्या ।'

'असल्या कसल्या पाटल्या बाई हाताल्या दाटल्या ।'

'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'

'माझ्या ग माहेरच्यांनी दिले मला गोट ।'

'असले कसले गोट बाई हत्तीचे रोट॥'

'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'

'माझ्या ग माहेरच्यांनी दिली मला बिंदी ।'

'असली कसली बिंदी बाई कपाळाला चिंधी ॥'

'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'

'माझा ग माहेरच्यांनी दिला मला हत्ती ।'

'असला कसला हत्ती बाई उधळतो माती ।'

'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?

'माझ्या ग माहेरच्यांनी दिला मला गडी ।'

'असला कसला गडी बाई, मिजास बडी ॥

'तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?'

'माझ्या ग माहेरच्यांनी दिली मला बाई ।'

असली कसली बाई रीतच न्हाई ॥'


नणंदा भावजया दोघीजणी.....भोंडल्याची ( भूलाबाई/हादग्याची) गाणी


नणंदा भावजया दोघीजणी । घरात नव्हतं तिसरं कोणी ।

शिंक्यावरचं लोणी । खाल्लं कोणी ?

'मी नाही खाल्लं । वहिनीनं खाल्लं ।

आतां माझा दादा येईल ग । दादाच्या मांडिवर बसेन ॥'

'दादा तुझी बायको चोरटी ।'

'असु दे माझी बायको चोरटी ।'

'घे काठी लाग पाठीं ।'

'घेत नाही काठी । लागत नाही पाठी ।

घरादाराची लक्ष्मी मोठीं ॥



एक लिंबु झेलू बाई ................भोंडल्याची ( भूलाबाई/हादग्याची) गाणी


एक लिंबु झेलू बाई, दोन लिंबं झेलूं ।

दोन लिंब झेलूं बाई, तीन लिंबं झेलूं ।

तीन लिंबं झेलूं बाई, चार लिंबं झेलू ।

चार लिंब झेलू बाई, पाच लिंबं झेलूं ।

पाचा लिंबांचा पानवडा , माळ घाली हनुमंताला ।

हनुमंताची निळी घोडी. येतां जातां कमळं तोडी ।

कमळ्याच्या पाठीमागं होती राणी ॥

अगं अगं राणी इथं कुठं पाणी ?

पाणी नव्हे यमुना जमुना,

यमुना जमुनेची बारिक वाळू, तिथं खेळे चिलारि बाळू ।

चिलारि बाळाला भूक लागली ।

सोन्याच्या शिंपेनं दूध पाजीलं पाटावरच्या घडीवर निजवलं ।

नीज रे चिलारि बाळा , मी तर जाते सोनारवाड्‍या ।

सोनारदादा सोनारभाई । गौरीचे मोती झाले कां नाहीं ?

गौरीच्या घरीं तांब्याच्या चुली , मांडव घातला मखमख पुरी ।

लगीन लागलं सूर्योंदयीं , भोजन झालं आवळीखालीं ।

उष्ट्या पत्रावळी चिंचेखालीं , शेणगोळा आंब्याखालीं ।

पानसुपारी तुळशीवरी , वरात निघाली हत्तीवरी ।



एके दिवशीं काऊ आला बाई का.....भोंडल्याची ( भूलाबाई/हादग्याची) गाणी


एके दिवशीं काऊ आला बाई काऊ आला

एकच कणीस तोडून नेलं बाई तोडून नेलं

सईच्या अंगणांत टाकून दिलं बाई टाकून दिलं

कांडून कुटून राळ केल बाई राळ केल

घागर घेऊन पाण्याला गेली बाई पाण्याला गेली

तिथं निळा विंचू चावला ग बाई चावला ग

आला ग माहेरचा वैद्य

डोक्यांत टोपी ग जरतारी

अंगांत सदरा बुट्टेदारी

नेसाया रेशमी धोतर

हातांत काठी ग चंदनाची

कसा ग दिसतो राजावाणी



एवढीसी गंगा झुळुझुळू वाहे.....भोंडल्याची ( भूलाबाई/हादग्याची) गाणी


एवढीसी गंगा झुळुझुळू वाहे

तांब्या पितळी नाय ग

हिरवी टोपी घाल ग

हिरवी टोपी हारपली

सर्पा आड लपली

सरपदादा हेकोडा

जाई आंबा पिकला

जाई नव्हें जुई नव्हें

चिंचेखालची राणूबाई

चिंचा तोडीत जाय ग

पांच पानं खाय ग

खातां खातां रंगली

तळ्यातं घागर बुडाली



पहिली ग मुक्ताबाई देवा देवा................भोंडल्याची ( भूलाबाई/हादग्याची) गाणी


पहिली ग मुक्ताबाई देवा देवा साजे

घातीला मंडोबा खेळींखेळीं खंडोबा

खंडोबाच्या नादीं बाई वर्षावर्षा आवपणी

आवपणीचं पाणी तसं गंगेचं पाणी

गंगेच्या पाण्यानं वेळीला भात

जेवीला कंथ हनुमंत बाळा

हनुमंत बाळाचे लांबलांब झोके

शिकारीचे डोळे हातपाय गोरे

भाऊ भाऊ खेळतो माता पुढं झळकती

झळकतीचं एकच पान

दुरून भुलाबाई नमस्कार



एलमा पैलमा गणेश देवा........भोंडल्याची ( भूलाबाई/हादग्याची) गाणी


एलमा पैलमा गणेश देवा ।

माझा खेळ मांडुदे करीन तुझी सेवा ।

माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी,

पारवे घुमती बुरजावरी ।

गुंजवाणि डोळ्याच्या सारविल्या टिका,

आमच्या गावच्या भुलोजी नायका ।

एवि निघा तेवि निघा , कांडा तीळ बाई तांदुळ घ्या ।

आमच्या आया , तुमच्या आया , खातील काय दुधोंडे ।

दुधोंच्याची लागली टाळी , आयुष्य दे बा वनमाळी ।

माळी गेला शेती भाता, पाऊस पडला येता जाता ।

पड पड पावसा थेंबो थेंबी , थेंबो थेंबीच्या आळव्या लोंबी ।

आळव्या तुझी सात कणसं , भोंडल्या तुझी सोळा वर्षं ।

अतुला तुझी सात कणसं , भोंडल्या तुझी सोळा वर्षं ।

अतुला मातुला चरणी घातूला, चरणीचे सोंडे हातपाय खणखणीत गोंडे ।

एक एक गोडां विसा विसाचा , साडे नांगर नेसायचा ।

नेसा ग नेसा बाहुल्यांनो , वरीस वर्ष पावल्यांनो ॥१॥