विठू माझा लेकुरवाळा
सांगे गोपाळांचा मेळा
निवृत्ती हा खांद्यावरी
सोपानाचा हात धरी
पुढे चाले ज्ञानेश्वर
मागे मुक्ताबाई सुंदर
गोरा कुंभार मांडीवरी
चोख जीव बरोबरी
बंका कडेवरी
नामा करांगुली धरी
जणी म्हणे गोपाळा
करी भक्तांचा सोहळा
- पी. सावळाराम
शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा,पोपट होता सभापती मधोमध उभा
पोपट म्हणाला, पोपट म्हणाला, "मित्रांनो
देवाघरची लूट, देवाघरची लूट !
तुम्हा अम्हां सर्वांना एक एक शेपूट
या शेपटाचे कराल काय?"
गाय म्हणाली, "अश्शा अश्शा, शेपटीने मी वारीन माशा."
घोडा म्हणाला, "ध्यानात धरीन, ध्यानात धरीन
मीही माझ्या शेपटीने, असेच करीन, असेच करीन,"
कुत्रा म्हणाला, "खुशीत येईन तेव्हा, शेपूट हलवीत राहीन."
मांजरी म्हणाली, "नाही ग बाई, कुत्र्यासारखे माझे मुळीच नाही,
खूप खूप रागवीन तेव्हा शेपूट फुगवीन, शेपूट फुगवीन."
खार म्हणाली, "पडेल थंडी तेव्हा माझ्या शेपटीची मलाच बंडी."
माकड म्हणाले, "कधी वर कधी बुडी, शेपटीवर मी मारीन उडी."
मासा म्हणाला, "शेपूट म्हणजे दोन हात, दोन हात.
पोहत राहिन प्रवाहात, पोहत राहिन प्रवाहात."
कांगारू म्हणाले, "माझे काय?"
"तुझे काय? हा हा हा !
शेपूट म्हणजे पाचवा पाय."
मोर म्हणाला, "पीस पीस फुलवुन धरीन, मी धरीन
पावसाळ्यात नाच मी करीन."
पोपट म्हणाला, "छान छान !
देवाच्या देणगीचा ठेवा मान.
आपल्या शेपटाचा उपयोग करा."
"नाही तर काय होईल?"
"दोन पायाच्या माणसागत, आपुले शेपूट झडून जाईल."
छोटेसे बहीणभाऊ,
उद्याला मोठाले होऊ
उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला
नवीन आकार देऊ
ओसाड उजाड जागा,
होतील सुंदर बागा शेतांना,
मळ्यांना, फुलांना, फळांना
नवीन बहार देऊ
मोकळ्या आभाळी जाऊ,
मोकळ्या गळ्याने गाऊ
निर्मळ मनाने, आनंदभराने
आनंद देऊ अन् घेऊ
प्रेमाने एकत्र राहू,
नवीन जीवन पाहू,
अनेक देशांचे, भाषांचे, वेशांचे
अनेक एकत्र होऊ
--वसंत बापट
हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
विठ्ठल विठ्ठल म्हणतील सगळे....
विठूराय कितीसे दूर....