Wednesday, December 29, 2010

तेव्हा

पहाटेच्या काळोखी फांद्यातून

अवेळी जागलेल्या कोणाएका
कोकिळेने
भ्रमिष्टपणे
दिली भिरकावून आकाशावर
कोठल्या स्वप्नाच्या स्पंजात रुतणारी
चौधारी
पल्लेदार स्वरावळ
नंतर सारं स्तब्ध….
संगमरवरी स्तंभाला टेकून
उभी राहिलेली व्याधाची चांदणी
किंचित हसली,
आणि रुपेरी वस्त्राचे हेम
अलगद उचलून
उतरायला लागली पहिली पायरी
क्षितिजाच्या तळाकडे…..
तेव्हा चारही वाजले नव्हते

-’मुक्तायन’ कुसुमाग्रज

No comments:

Post a Comment