माझं इठ्ठल मंदीर
अवघ्याचं माहेर
माझं इठ्ठल रखूमाई
उभे इटेवर
टाय वाजे खनखन
मुरदुंगाची धुन
तथे चाललं भजन
गह्यरी गह्यरीसन
टायकर्यांचा जमाव
दंगला दंगला
तुकारामाचा अभंग
रंगला रंगला
तुम्ही करा रे भजन
ऐका रे कीर्तन
नका होऊं रे राकेस
सुद्ध ठेवा मन
आता सरला अभंग
चालली पावली
जे जे इठ्ठल रखूमाई
ईठाई माऊली
शेतामंदी गये घाम
हाडं मोडीसनी
आतां घ्या रे हरीनाम
टाया पीटीसनी
उभा भक्तीचा हा झेंडा
हरीच्या नांवानं
हा झेंडा फडकावला
झेंडूला बोवानं
आतां झाली परदक्षीना
भूईले वंदन
हेचि दान देगा देवा
आवरलं भजन
आतां फिरली आरती
भजन गेलं सरी
बह्यना देवाचीया दारीं
उभी क्षनभरी
कवयित्री - बहिणाबाई चौधरी
Thursday, February 3, 2011
इठ्ठल मंदीर....................बहिणाबाई चौधरी
देव अजब गारोडी.............बहिणाबाई चौधरी
धरीत्रीच्या कुशीमधीं
बीयबियानं निजलीं
व-हे पसरली माती
जशी शाल पांघरली
बीय टरारे भुईत
सर्वे कोंब आले व-हे
गह्यरलं शेत जसं
अंगावरतीं शहारे
ऊन वा-याशीं खेयतां
एका एका कोंबांतून
पर्गटले दोन पानं
जसे हात जोडीसन
टाया वाजवती पानं
दंग देवाच्या भजनीं
जसे करती कारोन्या
होऊं दे रे आबादानी
दिसामासा व्हये वाढ
रोप झाली आतां मोठी
आला पिकाले बहार
झाली शेतामधी दाटी
कसे वा-यानं डोलती
दाने आले गाडी गाडी
दैव गेलं रे उघडी
देव अजब गारोडी !
Wednesday, January 5, 2011
मानूस मानूस मतलबी रे मान..... बहिणाबाई
मानूस मानूस
मतलबी रे मानसा,
तुले फार हाव
तुझी हाकाकेल आशा
मानसा मानसा,
तुझी नियत बेकार
तुझ्याहून बरं गोठ्यांतलं जनावर
भरला डाडोर
भूलीसनी जातो सूद
खाईसनी चारा
गायम्हैस देते दूध
मतलबासाठीं
मान मानूस डोलये
इमानाच्यासाठीं
कुत्रा शेंपूट हालये
मानसा मानसा,
कधीं व्हशीन मानूस
लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस !
अरे, संसार संसार.....बहिणाबाई
बरा संसार संसार
कशाला काय म्हणूं नही ? - बिना कपाशीनं उले त्याले ....... बहिणाबाई
बिना कपाशीनं उले
त्याले बोंड म्हनूं नहीं
हरी नामाईना बोले
त्याले तोंड म्हनूं नहीं
नही वार्यानं हाललं
त्याले पान म्हनूं नहीं
नहीं ऐके हरिनाम
त्याले कान म्हनूं नहीं
पाटा येहेरीवांचून
त्याले मया म्हनूं नहीं
नहीं देवाचं दर्सन
त्याले डोया म्हनूं नहीं
निजवते भुक्या पोटीं
तिले रात म्हनूं नहीं
आंखडला दानासाठीं
त्याले हात म्हनूं नहीं
ज्याच्या मधीं नही पानी
त्याले हाय म्हनूं नहीं
धांवा ऐकून आडला
त्याले पाय म्हनूं नहीं
येहेरींतून ये रीती
तिले मोट म्हनूं नहीं
केली सोताची भरती
त्याले पोट म्हनूं नहीं
नहीं वळखला कान्हा
तीले गाय म्हनूं नहीं
जीले नहीं फुटे पान्हा
तिले माय म्हनूं नहीं
अरे, वाटच्या दोरीले
कधीं साप म्हनूं नहीं
इके पोटाच्या पोरीले
त्याले बाप म्हनूं नहीं
दुधावर आली बुरी
तिले साय म्हनूं नहीं
जिची माया गेली सरी
तिले माय म्हनूं नहीं
इमानाले इसरला
त्याले नेक म्हनूं नहीं
जल्मदात्याले भोंवला
त्याले लेक म्हनूं नहीं
ज्याच्यामधीं नहीं भाव
त्याले भक्ती म्हनूं नहीं
त्याच्यामधीं नहीं चेव
त्याले शक्ती म्हनूं नहीं
Friday, March 12, 2010
मन वढाय वढाय ....... बहिबाई
मन वढाय वढाय उभ्या पीकातलं ढोर किती हाकला हाकला फिरी येतं पिकांवर मन मोकाट मोकाट याच्या ठाई ठाई वाटा जशा वा-यानं चालल्या पान्यावऱ्हल्या रे लाटा मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोन ? उंडारलं उंडारलं जसं वारा वहादनं मन पाखरू पाखरू याची काय सांगू मात ? आता व्हतं भुईवर गेलं गेलं आभायात मन जह्यरी जह्यरी याचं न्यारं रे तंतर अरे, इचू, साप बरा त्याले उतारे मंतर ! मन चपय चपय त्याले नही जरा धीर तठे व्हयीसनी ईज आलं आलं धर्तीवर मन एवढं एवढं जसा खाकसंचा दाना मन केवढं केवढं ? आभायात बी मायेना देवा, कसं देलं मन आसं नही दुनियांत ! आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत ! देवा आसं कसं मन ? आसं कसं रे घडलं ? कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं ! |
Thursday, December 31, 2009
अरे खोप्यामधी खोपा............बहिणाबाई चौधरी
अरे खोप्यामधी खोपा
अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाला टांगला
पिलं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला
खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखरांची कारागिरी
जरा देख रे मानसा
तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं
कवयित्री - संत बहिणाबाई चौधरी