Wednesday, June 1, 2011

पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा.....

दैवजात दुःखे भरतां दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा

माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात
राज्यत्याग काननयात्रा, सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा

अंत उन्नतीचा पतनीं होइ या जगात
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
वियोगार्थ मीलन होतें, नेम हा जगाचा

जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
दिसे भासतो तें सारें विश्व नाशवंत
काय शोक करिसी वेड्या, स्वप्निंच्या फळांचा ?

तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनांत
अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात
मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा

जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात ?
दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत ?
वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा

दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ
क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा

नको आंसु ढाळूं आतां, पूस लोचनांस
तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास
अयोध्येंत हो तूं राजा, रंक मी वनींचा

नको आग्रहानें मजसी परतवूंस व्यर्थ
पितृवचन पाळून दोघे हो‍उं रे कृतार्थ
मुकुटकवच धारण करिं, कां वेष तापसाचा

संपल्याविना हीं वर्षें दशोत्तरीं चार
अयोध्येस नाहीं येणें, सत्य हें त्रिवार
तूंच एक स्वामी आतां राज्यसंपदेचा

पुन्हां नका येउं कोणी दूर या वनांत
प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनांत
मान वाढवी तूं लोकीं अयोध्यापुरीचा

भरजरी ग, पितांबर, दिला फाडुन.........प्रल्हाद केशव अत्रे

भरजरी ग, पितांबर, दिला फाडुन
द्रौपदिसी बंधु शोभे नारायण

सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहिण
विचाराया गेले नारद म्हणून
बोट श्रीहरिचे कापले ग बाई
बांधायाला चिंधी लवकर देई
सुभद्रा बोलली, "शालु नि पैठणी
फाडुन का देऊ चिंधी तुम्हास मी ?"
पाठची बहिण झाली वैरिण !

द्रौपदी बोलली, "हरिची मी कोण ?
परी मला त्याने मानिली बहीण
काळजाचि चिंधी काढून देईन
एवढे तयाचे माझ्यावरी ऋण
वसने देउन प्रभू राखी माझी लाज
चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज !"
त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून

प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
जैसि ज्याची भक्ती तैसा नारायण
रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम
पटलि पाहिजे अंतरीची खुण
धन्य तोचि भाऊ, धन्य ती बहीण
प्रिती ती खरी जी जगी लाभाविण
चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न

Thursday, February 3, 2011

एखाद्याचें नशीब ...... गोविंदाग्रज

काही गोड फुलें सदा विहरती स्वगागनांच्या शिरीं,

काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरीं;
काही जाउनी बैसती प्रभुपदीं पापापदा वारि तें,
एखादे फुटकें नशीब म्हणुनी प्रेतास शृंगारितें ।

कोणी पर्वत आपुल्या शिरिं धरि हैमप्रभा शीतला,
कोणाच्या उदरामधून निघती मोठया नद्या निर्मला;
कोणाला वनदेवता वरितसे मोदांत जी नाहते,
एकाद्यामधुनी परंतु जळती ज्वालानदी वाहते !

झाडें जोडुनी पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती,
स्वच्छंदें जलबिंदु तोंच सगळ्या पानांवरी नाचती;
सारी पालवती, फुलें विहरती, शोभा वरी लोळते,
एखाद्यावर मात्र वीज पडुनी त्या जाळते पोळते !

चाले खेळ असा जगांत; बहुधा सौख्यांत सारे जरी,
एखादा पडतो तसाच चुकुनी दुःखार्णवीं यापरी
पाही कोण अशा हताश हृदया ? जो तो असे आपला,
देवा ! तूं तरि टाकिं अश्रु वरुनी, त्यासाठीं तो तापला !


परीटास.........केशवकुमार

परिटा येशिल कधी परतून?


काल दिलेल्या कपड्यांमधले दोन चार हरवून!
परिटा...

कोट रेशमी लग्नामधला मानेवर उसवून!
परिटा...

उरल्या सुरल्या गुंड्यांचीही वासलात लावून!
परिटा...

बारिकसारिक हातरुमाला हातोहात उडवून!
परिटा...

सद‍र्यांची या इस्तरिंने तव चाळण पार करुन!
परिटा...

खमिसांची ही धिरडी खरपुस भट्टीमधें परतून!
परिटा...

तिच्या भरजरी पैठणीची या मच्छरदाणी करुन!
परिटा...

गावांतील कपड्यांची सगळ्या गल्लत छान करुन!
परिटा...

रुमाल जरीचे आणि उपरणीं महिनाभर नेसुन!
परिटा...

सणासुदीला मात्र वाढणे घेई तुझे चोपुन!
परिटा येशिल कधी परतून?

या नभाने या भुईला दान द्यावे ............ना. धों. महानोर

या नभाने या भुईला दान द्यावे

आणि या मातीतून चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे

या नभाने या भुईला दान द्यावे
आणि माझ्या पापणीला पूर यावे
पाहता सुगंध कांती सांडलेली
पाखरांशी खेळ मी मांडून गावे

गुंतलेले प्राण या रानात माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदुन बेहोष होता
शब्दगंधे तू मला वाहून घ्यावे


कवी - ना. धों. महानोर.


इठ्ठल मंदीर....................बहिणाबाई चौधरी


माझं इठ्ठल मंदीर
अवघ्याचं माहेर
माझं इठ्ठल रखूमाई
उभे इटेवर

टाय वाजे खनखन
मुरदुंगाची धुन
तथे चाललं भजन
गह्यरी गह्यरीसन

टायकर्‍यांचा जमाव
दंगला दंगला
तुकारामाचा अभंग
रंगला रंगला

तुम्ही करा रे भजन
ऐका रे कीर्तन
नका होऊं रे राकेस
सुद्ध ठेवा मन

आता सरला अभंग
चालली पावली
जे जे इठ्ठल रखूमाई
ईठाई माऊली

शेतामंदी गये घाम
हाडं मोडीसनी
आतां घ्या रे हरीनाम
टाया पीटीसनी

उभा भक्तीचा हा झेंडा
हरीच्या नांवानं
हा झेंडा फडकावला
झेंडूला बोवानं

आतां झाली परदक्षीना
भूईले वंदन
हेचि दान देगा देवा
आवरलं भजन

आतां फिरली आरती
भजन गेलं सरी
बह्यना देवाचीया दारीं
उभी क्षनभरी


कवयित्री - बहिणाबाई चौधरी

देव अजब गारोडी.............बहिणाबाई चौधरी


धरीत्रीच्या कुशीमधीं
बीयबियानं निजलीं
व-‍हे पसरली माती
जशी शाल पांघरली

बीय टरारे भुईत
सर्वे कोंब आले व-हे
गह्यरलं शेत जसं
अंगावरतीं शहारे

ऊन वा-‍याशीं खेयतां
एका एका कोंबांतून
पर्गटले दोन पानं
जसे हात जोडीसन

टाया वाजवती पानं
दंग देवाच्या भजनीं
जसे करती कारोन्या
होऊं दे रे आबादानी

दिसामासा व्हये वाढ
रोप झाली आतां मोठी
आला पिकाले बहार
झाली शेतामधी दाटी

कसे वा-‍यानं डोलती
दाने आले गाडी गाडी
दैव गेलं रे उघडी
देव अजब गारोडी !