राम गणेश गडकरी (टोपणनावे: गोविंदाग्रज, बाळकराम) (२६ मे, इ.स. १८८५; नवसारी, गुजरात - २३ जानेवारी, इ.स. १९१९; सावनेर) हे मराठी कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक होते. गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि बाळकराम ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. ह्या साहित्याच्या जोडीला 'एकच प्याला', 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', आणि 'भावबंधन' ही चार पूर्ण नाटके (आणि 'राजसंन्यास' आणि 'वेड्यांचा बाजार' ही दोन अपुरी राहिलेली नाटके) लिहून गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.
नाटककार राम गणेश गडकरी, कवी गोविंदाग्रज आणि विनोदी लेखक बाळकराम या तीन रूपांनी रसिकजनांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारे राम गणेश यांची 23 जानेवारी 2011 ही 92 वी पुण्यतिथी. तेहतीस वर्षे आणि काही महिने (जन्म २६ मे १८८५, मृत्यू २३ जाने १९१९) इतकेच अल्पायुष्य गडकऱ्यांना लाभले. पण त्यांनी वाङ्मयीन क्षेत्रात न भूतो न भविष्यती अशी कामगिरी केली. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना वाहिलेली ही श्रद्धांजली!
‘मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा।
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा।।
असे अप्रतिम काव्य लिहिणारे गोविंदाग्रज. मुलासकट माणुसकीला, सिंधुसकट संसाराला, सद्गुणासकट सुखाला, जगासकट जगदीश्वराला या सुधाकराच्या निर्वाणीच्या निराशेतला अखेरचा प्रणाम, अशी नादमधुर भाषा लिहिणारे नाटककार राम गणेश गडकरी! ‘आम्ही गेलो त्यावेळी स्टेजवर मुख्य पुरुषपार्टी, मुख्य स्त्री पार्टी व एक भटाचे सोंग घेतलेला मनुष्य यांची कामे चालली होती. फक्त मुख्य पार्टी नटांनीच रंग लावला होता. तो सगळ्या अंगभर होता. रंग फारच वाईट. अगदी हळदीसारखा होता. भटाने रंग लावला नव्हता. पण त्याचे सोंग हुबेहूब झाले होते. त्याची नक्कल अगदी चोख होती, पण तो फार घाईने बोलत होता. म्हणून त्याचे बोलणे ऐकू येत नव्हते -नाटक कंपनीच्या बिऱ्हाडी राहणाऱ्या छोटय़ा ‘जगू’ने प्रत्यक्ष लग्नसमारंभाला हजर राहून लिहिलेला रिपोर्ट- बाळकराम या टोपण नावाने विनोदी लेखन करणारे गडकरी! राम गणेश गडकरी म्हणजे मराठी नाटय़- साहित्य क्षेत्रातला चमत्कारच आहे.
गडकऱ्यांच्या वाटय़ाला सुखासमाधानाचे दिवस फारच थोडे आले. उपेक्षा आणि अपमानाचे चटके सहन करीतच त्यांना जगावे लागले. ‘एकच प्याला’ (पहिला प्रयोग २० फेब्रुवारी १९१९ ला गंधर्व नाटक मंडळीने बडोदा येथे व बलवंत संगीत मंडळीचा पहिला प्रयोग ६ फेब्रुवारी १९२० ला सोलापूर येथे), ‘भावबंधन’ (१८ ऑक्टोबर १९१९ ला बलवंत संगीत मंडळीतर्फे अकोला येथे), ‘वाग्वैजयंती’ (काव्यसंग्रह १९२१ मध्ये प्रसिद्ध झाला) या गडकऱ्यांच्या कलाकृती त्यांच्या निधनानंतर (मृत्यू-२३ जानेवारी १९१९) रसिकांच्या समोर आल्या आणि त्यानंतरच गडकरी रसिकांच्या गळ्यातले ताईत बनले. ‘जिवंत असता लत्ता देती। मेल्यावर खांद्यावर घेती।। हे बोल गडकऱ्यांच्या बाबतीत एकशे एक टक्के खरे आहेत. चार पूर्ण (वेडय़ांचा बाजार, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, भावबंधन) आणि दोन अपूर्ण (राजसंन्यास, एकच प्याला- यातील पदे गडकऱ्यांचे स्नेही विठ्ठल सीताराम गुर्जर यांनी गडकरी निधन पावल्यानंतर लिहिली आहेत.), पावणेदोनशेच्या आसपास कविता (त्यातील अनेक कविता अपूर्ण स्वरुपात) आणि रंगभूमी मासिकातले काही लेख इतकीच गडकऱ्यांची साहित्यसंपदा! पण या त्यांच्या अल्प पण उत्कृष्ट साहित्याने खरोखर काळावरही मात केलेली आहे. ‘भावबंधन’ या नाटकातला अखेरचा प्रवेश त्यांनी पांडोबा नावाच्या लेखनिकाला लिहून घ्यायला सांगितला आणि त्यानंतर मध्यरात्री गडकऱ्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला.
नाटकाचा नाद, गैरशिस्त अभ्यास व अस्थिर मन:स्थिती यामुळे गडकऱ्यांना परीक्षेत अपयश आले आणि त्याच वर्षी (मे १९०६) त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकून, बार्शी मुक्कामी किलरेस्कर नाटक मंडळीत ‘मास्तर’ म्हणून नोकरी स्वीकारली. कंपनीतल्या मुलांना शिकवण्यापासून ते डोअरकीपपर्यंत सर्व कामे त्यांनी केली. नटवर्य गणपतराव बोडसांनी त्यांच्या नाटय़लेखनाला चालना दिली. गडकऱ्यांनी ज्यांना मनाने आधीच गुरुपदी मानले होते त्या तात्यासाहेब कोल्हटकरांची (श्रीपाद कृष्ण कोल्हटकर) प्रत्यक्ष भेट झाली. गडकऱ्यांची प्रतिभा दिसामासांनी फुलू लागली. ‘वेडय़ांचा बाजार’ हे नाटक आणि ‘रंगभूमी’ मासिकात ‘सवाई नाटकी’ या नावाने नाटय़विषयक लेख प्रसिद्ध होऊ लागले. ‘मासिक मनोरंजन’मध्ये ‘अल्लड प्रेमास’ ही कविता प्रसिद्ध झाली. ‘प्रेमसंन्यास’ या त्यांच्या नाटकाचा पहिला प्रयोग महाराष्ट्र नाटक मंडळाने मुंबई मुक्कामी सादर केला (१७ फेबुवारी १९१२) आणि त्यानंर १ जुलै १९१६ रोजी किलरेस्कर नाटक मंडळीने त्यांचे ‘पुण्यप्रभाव’ नाटक मुंबई मुक्कामी रंगभूमीवर आणले.
‘राम गणेश गडकरी’ ‘गोविंदाग्रज’ आणि ‘बाळकराम’ या नावांभोवती आता वलय निर्माण होऊ लागले. गंधर्व मंडळीसाठी त्यांनी ‘एकच प्याला’ लिहिले, बलवंत संगीत मंडळीसाठी ‘भावबंधन’च्या लेखनास प्रारंभ केला. ‘राजसंन्यास’ चा आराखडा कागदावर मांडला, लेखनाला सुरुवात केली आणि गडकऱ्यांच्या आजारपणाला सुरुवात झाली. त्यातच अत्यंत दुर्दैवी घटना घडली. गडकऱ्यांचे जिवलग मित्र त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी यांचे ५ मे १९१८ रोजी अपघाती निधन झाले. हा आघात गडकऱ्यांना जिव्हारी लागला. त्यांची प्रकृती खालावू लागली. पुण्यातून हवापालटासाठी- प्रकृतिस्वास्थासाठी गडकरी आपले बंधू बाबुलभाई यांच्याकडे सापनेर येथे गेले आणि काही दिवसांतच २३ जाने १९१९ रोजी मध्यरात्री गडकऱ्यांची प्राणज्योत मावळली. ‘तुझ्यापुढे बोलण्याची सोयच नाही’, तुमच्याकडे सोईचे बोलणेच नाही’. अशी चमत्कृतीपूर्ण संवाद लिहिणारे गडकरी. त्यांचा जन्म २६ मे १८८५, नवसारी येथे आणि त्यांचे निधन २३ मे १९१९ सापनेर या गावी. नवसारी आणि सावनेर केवळ शब्दांची उलटापालट. विलक्षण योगायोग!
गडकरी गेले. पण ते सरस्वतीच्या गळ्यातील कंठमणी ठरले. गडकऱ्यांच्या पहिल्या पुण्यतिथी दिनापासून तो आजपर्यंत आणि पुढेही गडकऱ्यांचा पुण्यस्मरण दिवस हा महाराष्ट्राचा, मराठी साहित्याचा, मराठी संस्कृतीचा संस्मरणीय दिवस. या नाटककाराला, या कवीला, या प्रेमाच्या शाहिराला आणि बाळकरामाला मुजरा करण्यात लहानापासून मोठय़ांपर्यंत सर्वाना मनस्वी धन्यता वाटते. महाराष्ट्राचे प्रचंड पुरुष आचार्य प्रल्हाद केशव अत्रे उर्फ कवी केशवकुमार यांनी ‘मनोरंजन’ मासिकाच्या फेब्रुवारी १९१९ च्या अंकात ‘अश्रूंची ओंजळ’ ही अप्रतिम कविता लिहून गडकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
प्रतिवर्षी आचार्य अत्रे गडकऱ्यांचे स्मरण करण्यासाठी व्याख्यान देत. लेख लिहीत. ते त्यांचे व्रतच होते. एके ठिकाणी आचार्य अत्रे यांनी लिहिले आहे. ‘‘गडकऱ्यांच्यावर महाराष्ट्रात मी कुठे अन् किती बोललो आहे अन् किती किती लिहिले आहे. याची आता मोजदाद करणे हे देखील कठीण आहे. त्यांच्याविषयी होते नव्हते ते सर्व सांगून झाले आहे. पण ते पुन्हा पुन्हा सांगण्याचा मोह काही आवरत नाही. गडकऱ्यांचा आठवावा प्रताप, गडकऱ्यांचा आठवावा साक्षेप, असेच माझ्या सारख्या त्यांच्या भक्ताला वाटते.’’ (गडकरी सर्वस्व). मराठीमधील नामवंत साहित्यिकांनी, नाटककारांनी, कवींनी, समीक्षकांनी गडकऱ्यांच्या कार्याची दखल घेतलेलीच आहे. अनेकांनी स्तुतिसुमनांची उधळण केली. अनेकांनी गडकऱ्यांच्या भाषेचा, कल्पनाविलासाचा आपल्या लिखाणात नक्कल करण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी त्यांचा विनोद स्वीकारला तर काहींनी त्यांच्या लिखाणातील दोषही दाखविले. पण गडकऱ्यांची महानता त्यांच्या टीकाकारासह सर्वानाच मान्य आहे. हीच तर गडकरी वाङ्मयाची एकमेवता.
गडकरी वाचल्याशिवाय, गडकरी म्हटल्याशिवाय उमगणार नाही. ही नशा काही औरच आहे. तुम्ही रंगकर्मी असा, रंगधर्मी असा, व्यावसायिक- प्रायोगिक, समान्तर- असमान्तर व नाटय़, नवकविता कोणत्याही मार्गाचे असा पण गडकरी वाङ्मयाला पर्याय नाही. त्याचा सखोल अभ्यास, मनन, चिंतन, प्रगटीकरण झालेच पाहिजे. ते होवो! श्रीशंवंदे। तुम्हा तो सुखकर हो शंकर।
वाऱ्यावरती थिरकत गेले झाडावरूनी पिंपळपान...............
जुन्या वाड्यांच्या जागी टोलेजंग इमारती होण्याच्या प्रक्रियेत इतिहासाच्या पाऊलखुणा पुसल्या जात असल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. ज्या घरासमोरील पिंपळाच्या झाडाकडे पाहून गोविंदाग्रज ऊर्फ ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांनी "पिंपळपान' ही कविता लिहिली, ते कसबा पेठेतील त्यांचे निवासस्थान काळाच्या पडद्याआड गेले आहे.
कसबा गणपतीजवळच असलेल्या फणी आळी तालमीपाशी "136 कसबा पेठ' येथे राम गणेश गडकरी यांचे अखेरच्या काळात वास्तव्य होते. पिंपळपान या कवितेबरोबरच "प्रेमसंन्यास' या नाटकाचे लेखनही या वास्तूतच झाले. 1919 मध्ये याच वास्तूत त्यांची प्राणज्योत मालवली. या सिन्नरकर वाड्यातील तिसऱ्या मजल्यावरील खोलीत गडकरी वास्तव्यास होते. मात्र, काळाच्या प्रवाहात ही गोष्ट इतिहासजमा झाली.
या वास्तूविषयी माहिती देताना इतिहासाचे अभ्यासक मंदार लवाटे म्हणाले, ""भालचंद्र वामन धडफळे या बालमित्राने 1910 मध्ये गडकऱ्यांना या वास्तूमध्ये राहण्यासाठी जागा दिली. त्यापूर्वी किर्लोस्कर नाट्यगृह म्हणजे सध्याचे वसंत चित्रपटगृह येथे काही काळ गडकरी राहत असत. "136 कसबा पेठ' येथे राहण्यास आल्यानंतर गडकरी यांनी मातुःश्री सरस्वतीबाई आणि बंधू शंकर यांना बोलावून घेतले. या वास्तूला ते "आमचा भूतमहाल' असे म्हणत असत.''
या वास्तूचे वर्णन करताना गडकरी म्हणतात, ""फणी आळीतील लहानशा गल्लीत हा आमचा सिन्नरकरांचा वाडा आहे, समोर एक पिंपळ आहे. तळमजल्यावर तुळशीराम वाण्याचे दुकान आहे. दुसरा आणि तिसरा मजला आमच्याकडे अवघ्या पाच रुपयांमध्ये भाड्याने आहे. गल्लीत टांगे, मोटारी व लोकांच्या रहदारीची वर्दळ बिलकूल नसल्याने जणू काय आम्ही एखाद्या खेड्यात राहतो, असे आम्हाला सदोदित वाटते. भोवतालच्या शांततेमुळे सरस्वतीदेवीचा संचार मी एकटाच असता येथे ताबडतोब होतो आणि त्या- त्या वेळी मी गद्य व पद्य लिहीत असतो.''
याच वास्तूत 15-16 वर्षांचे असताना आचार्य अत्रे त्यांचा "फुलबाग' कवितासंग्रह घेऊन गडकरी यांना भेटावयास आले होते. 13 जून 1917 रोजी गडकरी यांचा दुसरा विवाह याच वास्तूत झाला. त्यांच्या अवघ्या 34 वर्षांच्या जीवनातील अखेरचा नऊ वर्षांचा कालखंड या वास्तूने पाहिला आहे. अनेक मोठी माणसे त्यांना भेटायला येऊन गेल्याच्या नोंदी आहेत. गडकरी बाहेरून आले की समोरील पिंपळाला आणि वास्तूला नमस्कार करून मगच घरात जात, असे वि. ना. कोठीवाले यांनी "गडकरी जीवन चरित्रा'त लिहिले आहे. ही स्मृती जागविणारी वास्तू काळाच्या पडद्याआड गेली असली, तरी पिंपळ आणि पार आजही या बदलामध्ये तसाच राहिला आहे, असेही लवाटे यांनी सांगितले.