Saturday, January 22, 2011

केशवसुत .....कृष्णाजी केशव दामले

श्रेष्ठ कवी कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशवसुत यांचा दि. ७ ऑक्टोबर १८६६ रोजी मालगुंड, जि.रत्नागिरी येथे जन्म झाला.

वर्षानुवर्षे एकाच विशिष्ट पद्धतीने रचल्या जाणा-या कवितेला स्वच्छंद आणि मुक्त रूपात केशवसुतांनी प्रथम सर्वांसमोर आणले. त्यामुळे त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक संबोधले जाते.

इंग्रजीतील कवितांतून दिसणारा सौंदर्यवादी दृष्टीकोन केशवसुतांनी प्रथम मराठीत आणला. कवीची प्रतिभा स्वतंत्र असावी, कोणत्याही प्रभावाशिवाय असे ते म्हणत. तिने याच प्रकारचे काव्य रचावे, असेच रचावे असे तिला आपण आदेश देऊ नयेत असे त्यांचे म्हणणे होते. वर्डस्वर्थ, शेली, किटस् यांसारख्या इंग्रजी कवींच्या कवितांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. इंग्रजी काव्यातील चौदा ओळींचा सॉनेट हा काव्यप्रकार ‘सुनीत’ या नावाने त्यांनी मराठीत लोकप्रिय केला.

त्यांनी लिहिलेल्या कवितांपैकी फक्त १३५ कविताच आज उपलब्ध आहेत. पण त्यांच्या या अल्पसंख्य कवितांमध्ये अनेक विषय दिसून येतात. अन्याय, विषमता, अंधश्रद्धा, परस्पर स्नेहभाव, स्त्रीपुरुषांमधील प्रेम, त्याचबरोबर सामाजिक बंडखोरी, मानवतावाद, राष्ट्रीयत्त्व, गूढ अनुभवांचे प्रकटीकरण, आणि निसर्ग असे अनेक विषय त्यांनी सहजी हाताळले आहेत.

आम्ही कोण?, नवा शिपाई, तुतारी, सतारीचे बोल, झपुर्झा, हरपले श्रेय, मूर्तिभंजन, गोफण या काही त्यांच्या उल्लेखनीय कविता. गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी), बालकवी, रेंदाळकर यांसारखे सुप्रसिद्ध कवीसुद्धा स्वत:ला केशवसुतांचे शिष्य म्हणवून घेत असत.



मालगुंड येथील केशवसुत स्मारक

करा अपुल्या तू पहा चाचपून, उरा अपुलिया पहा तपासून

प्रकृती माझीही तिथे तुज कळेल, विकृती माझी तुज तिथे आढळेल.

किंवा

आपल्या घराची, पत्नीची आठवण काढताना ते म्हणतात;
श्वासांनी लिहिली विराम दिसती ज्यांमाजि बाष्पीय ते,
प्रीतीचे बरवे समर्थन असे संस्पृत्य ज्यांमाजि ते,
कांतेची असली मला पवन हा पत्रे आता देतसे,
डोळे झाकुनि वाचिता त्वरित ती सम्मूढ मी होतसे.

अशा प्रकारे प्रेमाचे विशिष्ट तत्त्वज्ञानही त्यांनी फार सूक्ष्म रीतीने व मराठीत तर प्रथमच आपल्या कवितेतून मांडले.

मराठी कवितेच्या क्षेत्रात क्रांती घडवणार्‍या, कवितेलाच आपले जीवनसर्वस्व मानणार्‍या या कलावंताला अवघ्या ३९ व्या वर्षी मृत्यूने गाठले हे मराठी साहित्याचे आणि महाराष्ट्राचे दुर्दैवच म्हणावे लागेल.

No comments:

Post a Comment