Thursday, January 20, 2011

कुसुमाग्रज....विष्णु वामन शिरवाडकर,(१९३७-१९९९)

विष्णु वामन शिरवाडकर,(१९३७-१९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककारसमीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन केले.
ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव या विषयावरील मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात.

कुसुमाग्रजांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते.
त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे बदलले. नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी.ए.ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली.
यानंतर स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. १९३२ साली झालेल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता.
१९३३ साली त्यांनी 'ध्रुव मंडळा'ची स्थापना केली.

कवी कुसुमाग्रज उर्फ वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी भाषा दिवस!

कुसुमाग्रजांना मराठी साहित्यातील योगदानाबद्दल १९८८-८९ मध्ये भारतातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला. असा बहुमान मिळवणारे-वि.स.खांडेकर यांच्यानंतरचे -ते दुसरे मराठी साहित्यिक होत. कुसुमाग्रज मुंबई येथे आयोजित पहिल्या जागतिक मराठी परिषदेचे (१९८९) अध्यक्ष होते. या परिषदेच्या अध्यक्षपदावरून बोलताना कुसुमाग्रजांनी मराठी भाषेच्या चिंताजनक स्थितीविषयी आणि शासनाच्या अनास्थेविषयी भाष्य केले होते. ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारतानाही त्यांनी मराठी भाषेविषयीचे विचार व्यक्त केले होते.
‘माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका’, ‘भाषा मरता देशही मरतो, संस्कृतिचाही दिवा विझे; गुलामभाषिक होऊनी अपुल्या प्रगतीचे शिर कापू नका’ या त्यांच्या काव्यपंक्तींतून त्यांचे मराठी-प्रेम दिसून येते.
कुसुमाग्रजांचे साहित्यातील योगदान व त्यांचे भाषा-प्रेम यांचा विचार करता जागतिक मराठी परिषदेच्या वतीने त्यांचा जन्मदिवस (२७ फेब्रुवरी) ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येऊ लागला.


No comments:

Post a Comment