Sunday, January 2, 2011

आगगाडी आणि जमीन - कुसुमाग्रज

नको ग! नको ग!
आक्रंदे जमीन
पायाशी लोळत
विनवी नमून -

धावसी मजेत
वेगत वरून
आणिक खाली मी
चालले झुरुन

या ओळींच्या यमक-प्रासात रेल्वे गाडीच्या गतीचा ताल ऐकू येतो.

छातीत पाडसी
कितीक खिंडारे
कितिक ढाळसी
वरून निखारे!

नको ग! नको ग!
आक्रंदे जमीन
जाळीत जाऊ तू
बेहोष होऊन.

आगगाडी मात्र स्वतःच्या मस्तीत गुर्मित म्हणते -

दुर्बळ! अशीच
खुशाल ओरड
जगावे जगात
कशाला भेकड

पोलादी टाचा या
छातीत रोवून
अशीच चेंदत
धावेन! धावेन!

(आगगाडीचा ताल संपूर्ण कवितेत जाणवतो)

या उन्मत्त गाडीचे बोल ऐकून जमीन सूडाने पेटून उठते.

हवेत पेटला
सूडाचा धुमारा
कोसळे दरीत
पुलाचा डोलारा!

जमीनीच्या ताकदीपुढे गाडीचे काहीही चालले नाही -

उठला क्षणार्ध
भयाण आक्रोश
हादरे जंगल
कापले आकाश

उलटी पालटी
होऊन गाडी ती
हजार शकले
पडती खालती!

No comments:

Post a Comment